25 Aug 2018

कला नियोजन: दृश्यकला क्षेत्रातील जुने पण नवे उद्योग प्रणाली




कला ही मुक्त, स्वच्छंदी आणि ललित असण्याचे आपण सगळे जाणतो. हे जरी वास्तव असलं तरी सांस्कृतिक व सामाजिक दृष्टीने कलात्मकता, सांस्कृतिक वारसा, रसिकता, मनोरंजन इ. आपल्याला समजेल अशा रीतीने पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था कार्य करते त्याला आपण कलेचे व्यवस्थापन असे म्हणतो. या व्यवस्थापनेत सजग आणि संवेदनशीलरीत्या काम करणाऱ्या व्यक्तीला कला नियोजक किंवा कला व्यवस्थापक असे म्हणू शकतो. समकालीन आणि ऐतिहासिक वारसा, पुरातन वाङ्मय, शिल्प, चित्र, भित्ती चित्रे, स्थापत्य, काव्य, अनेक घराणे किंवा तांडा यांच्याकडे परंपरागत चालत आलेल्या चालीरीती, भौतिक जीवनाशी निगडित वस्तूंची परंपरा, धार्मिक किंवा शुभ प्रसंगी म्हटली जाणारी पदे, गीत, ओव्या, नाटय़ आणि नृत्य प्रयोग, वस्त्रालंकार, वेशभूषा, खाद्य पद्धती असे विविध विषय कला नियोजनाच्या कार्यात समाविष्ट होतात. कला नियोजकांचे प्रचलित रूप म्हणजे विविध समारंभांचा आयोजन कर्ता म्हणून, पण आज नियोजकांची जबाबदारी सांस्कृतिक घडामोडींना दिशा देण्याची आहे. सांस्कृतिक वारसांच्या संगोपनाला UNESCO UN, SAARC अशा अनेक प्रमुख संस्थांकडून जागतिक पातळीवर प्राधान्य मिळत आहे. या लेखातून कला नियोजनाचे कार्य कशा पद्धतीने घडते, त्यातील सामाजिक, आíथक आणि वैयक्तिक प्रगती या व इतर अनेक मुद्दे समजून घेता येतील.
कला नियोजन ही संस्कृतीच्या प्रवाहात सातत्याने कळत नकळत प्रयोगात असलेली संकल्पना आहे. आपल्या सोसायटीत होणारे सांप्रदायिक कार्यक्रम हेसुद्धा काही अंशी कला नियोजनच. हे व्यासपीठ जिल्हा ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा उपलब्ध होतो तेव्हा त्या मागे विविध कार्यक्षमता, अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख, समाज व्यवस्थेचे भान, स्थानिक-जागतिक राजकीय स्थिती, सांस्कृतिक घडामोडींविषयी सजगता हे अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. औपचारिकरित्या कला नियोजकांचे कार्य आपल्याला वस्तू संग्रहालये, कला दालने, सांस्कृतिक संस्था, ग्रंथालये, संगीत, नाटक, सांस्कृतिक संमेलने, मोठय़ा कंपन्यांमध्ये असलेले सांस्कृतिक विभाग, लिलाव घर आणि डिजिटल मीडिया अशा विविध ठिकाणी आढळते. संग्रहालय, कला दालन अशा ठिकाणी त्यांना क्युरेटर, किपर, गॅलरी सहाय्यक, शिक्षण अधिकारी या पदांवर कार्य करताना आढळतात. संगीत, नाटक, सिने-कार्यक्रम, मुलाखत यांच्या प्रस्तुती मागे सर्व प्रकारच्या नियोजनाचा भार सांभाळणारे मॅनेजर्स, प्रोग्रॅम ऑफिसर (कार्याधिकारी) व त्यांच्या सोबत काम करणारे सहाय्यक हेसुद्धा कला नियोजकच होत. लिलावघरांमध्ये मोठय़ा प्रमाणात कला वस्तूंचे आíथक देवाणघेवाण होत असल्याने कलेचे जाणकार, अभ्यासक, अर्थशास्त्राचे ज्ञान असणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी विविध पातळीवर कार्य करतात. मोठय़ा उद्योग समूहांमध्ये उरफ  अंतर्गत शिक्षण, सामाजिक विकास योजना राबविल्या जातात ज्यामध्ये कला ही शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तींचे कार्य योजनेला योग्य आणि कलात्मकरीत्या राबवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्याशिवाय काही उद्योगसमूह कलासंग्रहदेखील करतात तर काही संदर्भात आंतरराष्ट्रीय वारसांच्या संगोपनासाठी आíथक आणि तांत्रिक साहाय्यदेखील करत असतात. अशा ठिकाणी नियोजकांची भूमिका महत्त्वाची ठरते. जे वेळच्या वेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना आपल्या कलेविषयक माहिती आणि संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियमांच्या पालनासाठी आवश्यक उपाय देऊन काळजी घेतात. UNESCO सारखी आंतरराष्ट्रीय संस्था सांस्कृतिक संयोजनाला, सर्वार्थाने समावेशक अशा कला शिक्षणाला प्राधान्य देत आहे. यामागील हेतू असा की, कलेच्या संवर्धनातून सृजन मूल्य आणि सांस्कृतिक वारसा यांच्यातील प्रवाही प्रक्रिया अबाधित ठेवणे.
कला संयोजकांचे कार्य उपरोक्त क्षेत्रांप्रमाणे भिन्न आणि विविधता पूर्ण असू शकेल. कलेचे संवर्धन या शब्दातच अनेक आणि विस्तीर्ण असे अर्थ गíभत आहेत. समोर असलेले कला प्रकार, कलाकार, त्यातील सौंदर्य आणि अर्थ-व्यापार, सौंदर्य मूल्य, त्याची व्यापकता, त्या कलाप्रकाराचे आणि स्थानिक जीवनाशी असलेले परस्पर संबंध, त्यात गुंतलेले व्यावहारिक आणि कायद्याची बाजू या सर्व गुणांचा विचार करणे, त्या विचारांना प्रत्यक्ष रूप देऊन सातत्याने आजच्या जीवनात त्याचे महत्त्व टिकवणे हा कला संयोजकांच्या कार्याचे प्रदीर्घ परीघ आहे. अर्थात हे सर्व कार्य वेगवेगळ्या पातळींवर, क्षमतेनुसार, इच्छा, रस, चिकाटी, उपलब्ध संसाधनांच्या आधारे सुरू राहणारी धडपडी क्रिया आहे. होतकरू आणि जिज्ञासूंना असे प्रश्न पडत असतील की, अशा परोपकारी कार्य करणाऱ्या लोकांचे घर कसे चालत असतील? त्यांना मिळणारा मोबदला सामान्य जीवन जगण्यास पूरक आहे का? त्यांचे कसे भागते?
लेखात वर सांगितलेल्या उपक्षेत्रांपैकी बहुतेक क्षेत्र ही संघटित आहेत, ज्या ठिकाणी कामाचे स्वरूप आणि व्याप्ती बव्हंशी ठरलेले असतात. बहुतेक ठिकाणी रोजगार कायदे लागू आहेत ज्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना इतर सहकाऱ्यांसारखेच नोकरीचे फायदे उपलब्ध आहेत. असे असतानाच कला क्षेत्रातील अधिकाधिक काम स्वरूपातून घडते. या क्षेत्राशी निगडित लोक मुळातच स्वच्छंदी, मुक्त विचारांचे आणि काही प्रमाणात विक्षिप्त स्वभावाचे असतात. अशा लोकांना नऊ ते पाच कार्यपद्धती आवडत नाही. बरेच वेळेला त्या त्या क्षेत्रांच्या कार्याच्या मागणीनुसार ठराविक वेळा वा मर्यादांचे पालनही शक्य होत नाही. याला आपण डायनॅमिक वर्क सिस्टिम म्हणू शकतो.
कला नियोजक जणू पडद्यामागचे कलाकार असतात. त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि गुंता कार्यक्षेत्राप्रमाणे बदलणारी आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अभ्यासू वृत्ती हे सर्व भिन्न  असल्याचा अंदाज वाचकांना आलाच असेल. गेल्या काही दशकांमध्ये अशा प्रकारच्या संयोजनाला व कामाला वाव आणि गरज वाढली असून या कार्यासाठी आवश्यक गुणांविषयी जाणून घेऊया.
कलेविषयीची आस्था हे प्रमुख गुण जे कोणत्याही कला नियोजकामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. समाज आणि संस्कृतींचा पोत याची जाण हे दुसरे महत्त्वाचे घटक. निवडलेल्या कलेच्या निर्मितीचे प्रत्यक्ष अनुभव किंवा निरीक्षण, त्या कलेचा इतिहास आणि आजची वाटचाल, याबद्दल समज आवश्यक आहे. याबरोबरच त्या कलेतील व्यवहाराचे आणि आíथक व्यापाराचे अंदाज असणे अभिप्रेत आहे. संगणकीय ज्ञान, संभाषण कौशल्य, वेळेचे नियोजन, कार्यसिद्धीसाठी सहकाऱ्यांसोबत काम करण्याची तयारी, प्रवासाची आवड, आपले संपर्क वर्तुळ प्रबळ करणे आणि आपल्या वैयक्तिक क्षमता आणि मर्यादांची समज हे सर्व गुण कला नियोजनातही आवश्यक आहेत.
एकूण कला क्षेत्र ही आजवर अनियोजित पद्धतीने चालणारी यंत्रणा राहिली आहे. कलाकार, कला शिक्षण संस्था, कलेला पाठिंबा देणारे रसिक, कला दालने, सरकारी योजना या सर्वाचा ताळमेळ भारतात अजून हवा तेवढा बसलेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजवर हा समग्र कला उद्योग अजूनही संभ्रमात आहे. पण बदलत्या काळानुसार या क्षेत्रातही प्रगतीचे वारे फिरू लागले आहेत. अर्थात जेव्हा कलेला उद्योगाचे रूप दिले जाते तेव्हा कलात्मक स्वातंत्र्यावर मर्यादा आणि शक्यता दोन्ही वाढतात. कलेतून मनोरंजन, नीतिमूल्यांची जोपासना, समाज सुधारणा होणे अशा अनेक अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचे ओझे कला आणि निगडित यंत्रणांवर टाकली जाते. योग्य आणि समावेशक अशा योजनेतून या अपेक्षा पूर्ण होण्यास दुजोरा मिळेल आणि सांस्कृतिक संवर्धनाचे कार्य पुढे जाऊ शकेल.
पुढील लेखात कला नियोजनाचा इतिहास, विविध संस्थांमधून दिले जाणारे औपचारिक प्रशिक्षण आणि पदवी, नमूद केलेल्या उपक्षेत्रांमधील कामाचे स्वरूप, संलग्न आíथक, राजकीय मुद्दे या सर्वाविषयी माहिती करून घेता येईल.

Article Publshed in Loksatta

11 Aug 2018

कला नियोजन आणि संधी



NGMA, मुंबई येथे विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शनांतर्गत कार्यशाळा

कलेची आवड असलेल्यांसाठी कलेची निर्मिती इतकेच काही करिअर नाही!
कला नियोजन ही संकल्पना निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून चालत आलेली परंपरा आहे. विसाव्या शतकापासून या विषयात औपचारिक दखल घेऊन विद्यापीठांमधून पदवी अभ्यासक्रमांना युरोप, अमेरिकेत व लंडन येथे सुरुवात झाली. इतिहासात कला नियोजन हे अनेक पातळींवर आणि सुप्तरीत्या आणि बहुतेक वेळी इतर सांस्कृतिक व्यवहारात समरस असल्याने त्याचा नेमके इतिहास मांडणे अवघड आहे. तरी १९७० नंतर जागतिक स्तरावर दृश्य आणि रंगमंचावरील कलांचा समाजावरील परिणाम ओळखून त्याचे व्यावसायिक, आíथक आणि सांस्कृतिक लाभ घेण्यासाठी या क्षेत्रातील शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्याचे कळते.
कला नियोजन हे व्यावसायिक गरजेतून तयार झाले, ज्यामुळे अपेक्षित कलात्मक परिणाम अगर बदल (समाज आणि कलेत) घडवून आणण्यासाठी, त्या परिणामांचा प्रभाव मोजण्यासाठी आणि निरीक्षणातून पुढील धोरणे तयार करण्यासाठी उपयुक्त साधने प्राप्त होतात. नियोजन आणि नियोजकाचे कार्य दृककला नियोजनाच्या एका उदाहरणातून पाहू या. सध्या कोची येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कोची मुजिरीस बिएनालेसारख्या मोठय़ा कला प्रदर्शनाच्या उदाहरणातून नियोजनाचे टप्पे, गुंता आणि व्यवहार समजून घेऊ. पहिल्या लेखात नमूद गुणांखेरीज नियोजनासाठी संयोजक दष्टी हे महत्त्वाचे. प्रदर्शनपूर्व तयारीत प्रदर्शनाची भूमिका – कन्सेप्ट व हेतू, प्रदर्शन स्थळ, आवश्यक आíथक पाठबळ आणि उपलब्धता, कलाकृती किंवा सहभागी होणाऱ्या कलाकारांची निवड, निवड प्रक्रियेचे निकष, स्थानिक राजकीय, सांस्कृतिक धोरणांचा अंदाज घेऊन प्रदर्शनाच्या प्रभाव आणि परिणामांचा अंदाज बाळगणे प्रदर्शनाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रदर्शन वास्तवात आणण्यासाठी गरजेची क्रिया ज्याला लॉजिस्टिक्स म्हणतात असे कार्य म्हणजे प्रत्यक्ष कलाकृतींचा संग्रह असतो. तो त्या त्या कलाकार किंवा संग्राहकांकडून मागवणे, प्रदर्शन दालनात मांडणीचा आराखडा तयार करणे, कलाकृतींचे सुरक्षित वाहतूक, कलाकृतींचा विमा, आवश्यक सरकारी आणि खासगी परवाने, दालनात असणारी विद्युत आणि प्रकाशव्यवस्था, व्हिडीओ किंवा साऊंड मांडणी – कलाकृतींसाठी विशिष्ट वातावरण निर्मितीची, त्यासाठी टीव्ही/ प्रोजेक्टर, योग्य ध्वनिप्रकाश योजना, दालनात दर्शकांना कलाकृतींच्या निरीक्षणासाठी उपलब्ध मार्ग व फलक अशा सर्व बाबींचा नियोजकांच्या संघाला तयारी करणे अभिप्रेत आहे. याव्यतिरिक्त अनपेक्षित अडचणी आणि आव्हानांसाठी अनुभवी आणि चतुर नियोजकांचा संघ असणे, आवश्यक आहे.
प्रदर्शन काळात कलाकृतींच्या संरक्षणासाठी (इजा होणे, चोरी होणे, नसíगक आपत्ती) योग्य ते उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ज्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती आहे त्यांचे कलात्मक आणि आíथक मूल्य प्रचंड असते. योग्य काळजी घेतली न गेल्याने कलाकृतीचे नुकसान तर होईलच त्याबरोबरच नियोजकांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
प्रदर्शनाचे यश बहुसंख्य दर्शकांच्या सहभागात आहे. त्यासाठी उपयुक्त असे प्रचार – समाज माध्यमे, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या, संकेतस्थळांवर पुरेशी माहिती, सातत्याचे जाहिरात हे आवश्यक घटक आहेत. याहीपेक्षा दर्शकांना गुंतवून ठेवण्यासाठी विविध कार्यशाळा, फिल्म प्रदर्शन, चर्चासत्र, कलाकारांसोबत वॉक थ्रू अशा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ही प्रदर्शनाव्यतिरिक्त करण्याची कामे आहेत. सहभागासाठी विद्यार्थी, कला-विद्यार्थी, उत्सुक आणि हौशी कलाकार, सामान्य वर्ग, विशेष गरज असणारे नागरिक अशा सर्वाचा विचार केल्याने खऱ्या अर्थाने प्रदर्शनाचे सार्थक होते.
वर दिलेली सर्व माहिती एका आदर्श कला नियोजनाचे अगर प्रदर्शनाचे अविभाज्य घटक आहेत. पण वास्तवात असे चित्र तयार होण्यासाठी अत्यंत धाडसी वृत्ती पाहिजे. त्या सोबत सक्षम कार्यप्रणाली आणि सूज्ञ, तत्पर आणि चिकित्सक असे सहकारीदेखील पाहिजेत. अर्थात हे सर्व कोणत्याही नियोजनात लागू पडणारे घटक आहेत. कलेत मात्र या सर्व गुणांसमवेत कला संबोधनासाठी नेमके विषय आणि आशय हेरण्याची क्षमता सर्वाधिक महत्त्वाची. सामाजिकदृष्टय़ा नाजूक विषय हाताळताना विषयाची प्रदर्शनातून मांडणी अशा रीतीने करावे लागते, ज्यामुळे दर्शक-समाजाला विचार करण्यास प्रेरित करेल.
NGMA, मुंबई येथील दालनाचे दृश्य
आधुनिक दृश्य कला ही भारतीय सांस्कृतिक जीवनात सलग न आल्याने समकालीन दृक भाषा समजणे अवघड आणि आपल्या आजच्या जीवनाशी विसंगतदेखील आहे. ही विसंगती युरोपातून भारतात आलेल्या नूतन कला प्रवाहांच्या परिणामाने निर्माण झालेले आहे. त्याशिवाय जलद गतीने बदलणाऱ्या समाजव्यवस्था आणि तंत्रज्ञान यामुळे संभ्रमाचे वातावरण कला नियोजकांपुढे असलेले प्रमुख आव्हान आहे. कलाकृतींतील सौंदर्यानुभव, आणि महत्त्व कमी न करता त्यातला आशय बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत कसोटीचे आहे. सांकल्पनिक आव्हानांशिवाय राजकीय आणि आíथक आव्हानेही या संपूर्ण प्रक्रियेला विराम लावणारे ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन आयोजित करताना सामील असलेल्या देशांच्या आपसातील सांस्कृतिक धोरणे, प्रदर्शन साध्य होण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शासकीय आणि बिगरशासकीय संस्था यांच्यामधील संवाद, अर्थसाहाय्य पुरवणारे प्रायोजक व मिळणाऱ्या धनराशीचे नियोजन, जमा-खर्च या तेवढय़ाच आव्हानात्मक बाबी आहेत. आयोजकांची विश्वसनीयता सिद्ध झाल्याखेरीज प्रायोजकांचे आणि शासकीय पाठबळ मिळणे कठीण आहे.
आतापर्यंत मांडलेल्या विषयात मोठय़ा पातळीवर होणाऱ्या प्रदर्शनाच्या उलाढालींचा विचार आपण केला. यातल्या बहुतेक बाबी सर्व दृश्यकला आणि रंगमंचीय कलांच्या नियोजन आराखडय़ात थोडय़ाफार फरकाने सारख्याच असतात. नियोजन म्हटल्यावर ऑन फील्ड आणि डेस्कटॉप वर्क दोन्ही कमी-जास्त प्रमाणात असतात. अनेक प्रकारच्या लोकांशी संवाद साधणे, भेटीगाठी घेणे, ऑफिसमधून ई-मेल संपर्क, कार्य निर्वाहासाठी आखलेली कामे आणि दिलेल्या मुदती, अनुदान प्रस्ताव लिहिणे, ग्रांट लेखन, घडामोडींचे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन), फोटोग्राफी, रिपोर्ट तयार करणे, जमा-खर्च राखणे, वेळच्या वेळी प्रसारमाध्यमातून उपक्रमांची बातमी देणे, त्यासाठी आकर्षक पोस्टर बनविणे या व इतर अनेक कामे सामील असतात. अर्थात सगळं काही एकच व्यक्ती करणे अपेक्षित नसून अनुभव, ज्ञान, आवड आणि चिकाटी या आधारांवर नियोजकांवर जबाबदारी सोपवली जाते. काही छोटय़ा संस्थांमध्ये ही अनेक कामे दोन किंवा तीन व्यक्ती सांभाळत असतात.
कला नियोजन क्षेत्रातील शिक्षण जगभरातील विद्यापीठांमध्ये, खासगी संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतून उपलब्ध आहेत. आर्ट्स मॅनेजमेंट, क्युरॅटोरिअल स्टडीज, हेरिटेज मॅनॅजमेन्ट, लिबरल आर्ट्स स्टडीज, मानव्य शास्त्र, वस्तुसंग्रहालयाचे शास्त्र – म्युझिऑलॉजी, बीबीए, एमबीए अशा निरनिराळ्या अभ्यासक्रमांतून कला नियोजनाचे प्रशिक्षण सुरू आहे. काही आंतरराष्ट्रीय लिलावगृहांनी घरांनी कलावस्तूंच्या व्यवहाराच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमालाही काही वर्षांपूर्वीच सुरुवात केली आहे. भारतात मुंबई आणि बडोदा विद्यापीठाचे म्युझिऑलॉजी अ‍ॅण्ड कन्झव्‍‌र्हेशन, सिंबॉयसिसमधील लिबरल आर्ट्स, मास कम्युनिकेशन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील इंडॉलॉजी, हेरिटेज टूरिजम, लखनौ येथील राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण अनुसंधानशाला येथील कार्यशाळा, बेंगळुरू येथील सृष्टी या कला आणि डिझाइन संस्थेतील विविध अभ्यासक्रम, असे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याशिवाय मुंबईतील मोहिले पारीख केंद्र, दिल्ली येथील फाऊंडेशन फॉर इंडियन कंटेम्पररी आर्ट्स, इंडिया फाऊंडेशन फॉर आर्ट्स, स्पिक मॅके, काही कला दालने अशा विविध खासगी संस्थांमधून कार्यशाळा, संशोधन अनुदान या माध्यमातून कला नियोजन शिकणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या जिज्ञासूंना ज्ञान आणि स्थानही मिळत आहे.

Article Published in Loksatta